गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीची गाडी अद्यापही शंभर टक्के रुळावर आलेली नाही. काही विशेष आणि मोजक्याच गाड्या सध्या धावत आहेत. रेल्वेस्थानकावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यातच प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपये केला होता. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीत बरीच घट झाली होती. आता हा दर जरी पुन्हा १० रुपये करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापही याबाबत निर्देश गोंदिया रेल्वेस्थानकाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपयेच कायम आहे. हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वेस्थानक असून, लॉकडाऊनपूर्वी दररोज दीडशे गाड्या या रेल्वेस्थानकावर ये-जा करीत होत्या. आता ही संख्या ४० वर आली आहे. या रेल्वेस्थानकावर सद्य:स्थितीत ३ हजार प्रवासी ये-जा करीत आहेत, तर सध्या दररोज दीडशे प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होत आहे. एकंदरीत आता सर्वच व्यवहार सुरळीत झाले असून, ये-जा करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीतसुद्धा वाढ झाली आहे.
.....................
प्रवासी संख्येत झाली वाढ
गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वांत कमी आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश होता. ७ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत झाले असून, बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. मागील आठवडाभरापासून प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून, दररोज ३ हजार प्रवासी ये-जा करीत आहेत.
................
तिकीट वाढले तरी
लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वेस्थानकावरून दररोज दीडशे गाड्या धावत होत्या, तर २५ हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करीत होते. मात्र, दीड वर्षापासून कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूकसुद्धा ठप्प होती. आतासुद्धा काही मोजक्याच रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीची संख्या २० ते ३० वर आली होती. यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकाचे दीड वर्षात प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या माध्यमातून प्राप्त होणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
................
आठवडाभरापासून वाढली प्रवाशांची वर्दळ
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने आता सर्वत्र अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची संख्यासुद्धा मागील आठवड्यापासून वाढली आहे. गोंदिया रेल्वेस्थानकावरून दररोज तीन हजारांवर प्रवासी ये-जा करीत आहेत. अद्याप लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे गर्दी वाढली नाही. या गाड्या सुरू झाल्यास प्रवासी संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रॉय यांनी सांगितले.
..................
प्लॅटफाॅर्म तिकिटातून होणारी कमाई
२०१९- ४४ लाख रुपये
२०२०- ७ लाख २० लाख हजार रुपये
२०२१- २० हजार रुपये
...................
स्थानकातून दररोज जाणाऱ्या गाड्या : ४०
रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या : ३ हजार