बळीराजा आनंदीत : तालुक्यात शेतीच्या कामाला वेग लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आषाढी पौर्णिमा संपताच कृष्ण पक्षाच्या आगमनासह पावसाचेही सुखद आगमन झालेले आहे. पहाटे पासून पावसाने मध्यमगतीने सुरुवात केली असून शेती शिवारात सर्वत्र पावसाची हजेरी लागली त्यामुळे शेतात कामाला वेग आला आहे. आतापर्यंत खऱ्या अर्थाने दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. पौर्णिमेच्या वेळी भरती ओहटीचा जोर वाढल्याने मान्सून प्रवाहाला सुध्दा वेग वाढतो. सध्या अरबी समुद्रात भरती ओहटी वाढली असून या प्रभाव वाढू लागला आहे. यामुळे मान्सून सुध्दा पुढे जाण्यास सक्षम झाला आहे. यापूर्वी पाऊस काही मोजक्या ठिकाणी पडत होता. कारण की, त्याला चालना देणारी परिस्थीती निर्माण होत नव्हती. त्यामुळे सर्वत्र मान्सूननी ढग वाहत नव्हते. मात्र आता मान्सूनी ढग निर्माण होत असून पुढील १५ दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमावस्येच्या काळात भरपूर पाऊस पडेल आणि शेतीची कामे सहज पूर्ण होण्यासाठी मदत मिळेल. १० जुलैला श्रावण मास सुरु झाला असून श्रावण महिना पाऊस पाडणारा महिना मानला जातो. याच महिन्यात शेतीची कामे करण्यासाठी उत्तम काळ असतो. त्यामुळे आता पावसाचे आगमन झाले असून शेती कामाला वेग येईल. सुरुवातीला पाऊस उशीरा आल्याने पेरणीची कामे मागे पडली. त्यामुळे थोड्या प्रमाणात रोवणीला उशीर झाल्यासारखे वाटू लागले. परंतु यापुढे पुरेशा पाऊस पडल्यास त्याची भरपाई होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती ती आता पूर्ण होईल. मात्र त्यांची रोवणी थोडी उशीरा चालेल. आतापर्यंत बोअरवेलधारक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात रोवणीची कामे उरकून टाकली. बाकीची रोवणी लवकर आटोपण्यात मदत मिळेल. त्यामुळे मागे पडलेल्या शेतकऱ्यांना मनुष्यबळांचा व इतर साधनाचा लाभ घेऊन वेळेवर कामे करुन घेण्यास मदत मिळेल.उंदराचे आवाहन ठरले सार्थक मृग नक्षत्राचे वाहन मेंढा असून आद्रा नक्षत्रात कोल्हा वाहन असून पावसाने सवारी केली नाही. त्यामुळे दमदार पाऊस पडला नाही. आता पावसाच्या चौथ्या नक्षत्राला सुरुवात झाली असून या नक्षत्रात पावसाचे वाहन उंदीर असून कृष्ण पक्षासह नक्षत्रालाही सुरुवात झाली आहे. त्यावर उंदराचे आवाहन पावसाने स्वीकारले असून भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील दोन आठवडे सतत पाऊस येण्याचे संकेत असून अमावस्येपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. पुढच्या आठवड्यात अतिवृष्टी सुध्दा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार आता पावसाचे सुखद आगमन झाले असून शेतकरी आनंदीत झाला आहे.
पावसाचे सुखद आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 12:50 AM