गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही म्हणून केंद्र शासनापासून तर गावातील ग्रामपंचायतीनेदेखील फूल नव्हे, तर फुलाची पाकळी म्हणून मदत केली. सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व समाजातील धनाढ्य व्यक्तींनी गोरगरिबांना, गरजूंना, विधवा, परित्यक्ता यांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, गव्हाचे पीठ, सोयाबीन वळी, चना डाळ, तूरडाळ, हरभरा अशा विविध वस्तू गोरगरिबांना वाटप केल्या. जणू हे वाटप करण्याची पैजच लागली असावी असे चित्र होते.
मागच्या वर्षी लाॅकडाऊन सुरू झाले तेव्हा गोरगरिबांनी पैसे कमविले तेव्हा त्यांच्याजवळ पैसेही होते तरीही त्यांना मदत करण्यात आली होती; परंतु यंदा कोरोनामुळे कुणाकडे पैसे नसताना गोरगरिबांना या कोरोनाचा संकटाचा सामना करताना पोटाचा प्रश्न आड येत आहे. अशात महाराष्ट्र सरकारने तुटपुंजी मदत करण्याची घोषणा केली; परंतु ही मदत तोकड्या लोकांनाच मिळणार आहे. उर्वरित गोरगरिबांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवनाची समस्या भेडसावत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो प्रकाशित करणाऱ्यांनी यंदा का मदतीसाठी हात पुढे केला नाही. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावेत असा तर धान्य देणारे विचार करीत नाही ना, असा सवाल उपिस्थत होत आहे.
..............
बॉक्स
मदतीला फॅड बनवू नका
एखाद्या नेत्याने आवाहन जर केले तरच आपण गोरगरिबांना मदत करू, असा गोड गैरसमज समाजात निर्माण झालेला दिसतो. मागच्या वर्षी देशातील बड्या नेत्यांच्या आवाहनावरून उद्योजकांपासून तर गावखेड्यांतील लोकांनी आपापल्या परीने मदत केली; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. मागच्या वर्षी फक्त माध्यमांमध्ये आपला फोटो छापून येईल म्हणून मदत वाटप केली की काय? मदत करण्याचा एक फॅड त्यावेळी तयार झाला होता. मग आता गोरगरिबांना मदत कोण करणार, दानदाते आपला मदतीचा हात पुढे करतील का, असा सवाल होत आहे. कोरोनामुळे गोरगरिबांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.