नागरिकांची मागणी : पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करालोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : रस्ता गावाच्या विकासाचा चेहरा असतो. चांदोरी खुर्द, पिपरीया, सावरा, अर्जुनी हा पाच ते सहा किमी रस्ता मागील कित्येक वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याने या रस्त्याला न्याय मिळाला नाही. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. हा ग्रामीण मार्ग असून अत्यंत रहदारीचा व बस वाहतुकीचा आहे. मध्य प्रदेशकडे जाणारा रस्ता जवळच आहे. पिपरीया रेती घाट लिलावात असल्याने ट्रॅक्टर -ट्रकने रेती वाहतूक केली जाते. शासनाला कोट्यवधी रुपये महसूल मिळूनही रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष न देणे म्हणजे ‘अच्छे दिन’ कुणाचे, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. बांधकाम विभागाला चांदोरी खुर्द, पिपरीया, सावरा, अर्जुनी ग्रामपंचायतींनी पत्र व ठराव देऊनही तसेच लोकप्रतिनिधीला याची जाणीव असूनही दुर्लक्षपणा करीत आहेत. त्यामुळे येथील अधीकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहे. खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले यांनाही या रस्त्याची माहिती देण्यात आली आहे.सदर रस्त्याने तिरोडा पिपरीया बस सुरु आहे. विद्यार्थी बसने प्रवास करतात. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी दुरुस्त झाला नाही तर बस बंद होणार व नागरिकांची गैरसोय होईल. तरी रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
चांदोरी-पिपरीया-सावरा-अर्जुनी रस्त्याची दुर्दशा
By admin | Published: May 24, 2017 1:37 AM