नाल्यांवर अतिक्रमण सफाईत अडसर
गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी नाल्यांत कचरा साचून नाल्या जाम झाल्या आहेत. सांडपाण्यामुळे त्यातून दुर्गंधी सुटत आहे. नगर परिषदेने लक्ष देत नाल्यांवरील अतिक्रमण काढणे गरजेचे झाले असल्याचे नागरिक बोलत आहेत.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था
देवरी : शहरातील विविध भागांतील मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, स्थानिक नगरपंचायतने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे रस्त्यांची समस्या कायम आहे.
ग्रामीण कारागिरांवर उपासमार
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुनीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले असून उपासमारीची वेळ आली आहे.
घाटकुरोडा- देव्हाडा रस्त्याची दुरवस्था
मुंडीकोटा : जवळील ग्राम घाटकुरोडा ते देव्हाडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. संबंधित विभागाने लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घाटकुरोडा हे गाव नदी व नाल्याच्या मध्यभागी वसले आहे. त्यामुळे या गावाला पुराचा वेढा असतो. यंदा गावात पूर आला होता व त्यामुळे शेतीचे फार नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झालेली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर पूर होता व त्यामुळे रस्त्यावरील मुरुम व गिट्टी पुरात वाहून गेली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.