शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेल्या सा.बां. विभागाने या रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. शेंडा ते सडक अर्जुनीचे अंतर १४ कि.मी. आहे. सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील लोकांना शासकीय कामानिमित्त याच मार्गाने प्रवास करावा लागतो तर उखडलेल्या रस्त्यामुळे १४ कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. यावरुन रस्त्याचे काय हाल झाले असतील याची कल्पना येते.जागोजागी रस्ता उखडला असून गिट्टी वर आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दररोज अपडाऊन करणारे छातीत दुखापत होते असे सांगत आहेत. त्याचप्रमाणे वाहन कुठे पंक्चर होईल याचा नेम नाही. याच रस्त्यावर अनेक जिवघेणे वळण आहेत. वळणावर गवताचे साम्राज्य पसरले आहे. समोरुन येणारी वाहने एकमेकांना दिसत नसल्याने नेहमीच अपघात घडत आहेत. तरीही बांधकाम विभागाने कुठेही वाहने हळू चालवा, हॉर्न वाजवा, अथवा धोक्याचे वळण असे बोर्ड लावलेले नाही. त्याचप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी ब्रेकर्स तयार केले नाही.मागील वर्षी याच मार्गावर दोन कि.मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले होते. वापरात आणलेली गिट्टी पूर्णत: मातीमिश्रित होती. डांबराचे वापर फारच कमी होता. त्यामुळे रस्ता सोबतच उखडायला लागला होता. ही बाब वृत्त पत्राच्या माध्यमातून सा.बा. विभागाला जागे करण्यात आले होते. परंतु आपसात सोटेलोटे असल्याने त्या कंत्राटदारावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.रस्त्यावर खड्डे पडले की गिट्टी टाकून थूकपॉलीस करुन त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो व आठवडा लोटला की रस्त्याची दशा ‘जैसे थे’ होते, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या शेंडा ते सडक अर्जुनी मार्गाची दुर्दशा झाली आहे. सततच्या रहदारीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हा मार्ग पक्का व मजबूत होणे गरजेचे आहे. केवळ नागरिकांची ओरड म्हणून थूक पॉलीस करु नये, शासनाचे पैसे स्वत:च्या घशात न टाकता लोकपयोगी कामाकरताच लावून या रस्त्याला कायमस्वरुपी चांगले करावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)
शेंडा ते सडक-अर्जुनी रस्त्याची दुर्दशा
By admin | Published: January 17, 2015 11:01 PM