मुंडीकोटा : जवळील ग्राम चांदोरी ते भंभोडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चांदोरी या गावावरून अनेक नागरिक तसेच शालेय विद्यार्थी भंभोडी रस्त्याने येऊन सरळ येथे येतात. मुंडीकोटा हे गाव केंद्राचे ठिकाण असून येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे बरेच रुग्ण येत असतात. यापूर्वी भंभोडी या गावाजवळ रेल्वे गेट होते; पण बंद करण्यात आले आहे. त्या गेटजवळ रेल्वेने ये-जा करण्याकरिता बोगदा तयार केला आहे. त्यामुळे चांदोरी येथील अनेक नागरिक बोगद्यातून येत असतात; पण चांदोरी ते भंभोडी हा रस्ता जीर्ण झाला असून गिट्टी व मुरूम वर आले आहे.
हा रस्ता यावेळी अपघाताला आमंत्रण देत आहे. तसेच चांदोरी येथील विद्यार्थी मुंडीकोटा येेथे महाविद्यालय शिक्षण घेण्यास येत असतात. तसेच चांदोरी या गावी भाजीपाल्यांच्या वाड्या जास्त प्रमाणात असल्यामुळे येथील शेतकरी येथे माल विकण्याकरिता येत असतात. त्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करून रस्ता पार करावा लागतो. यावेळी या रस्त्यांनी दोनचाकी तसेच चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्याने वाहन गेल्यानंतर नेहमीच रस्त्यावरील धूर उडत असते. त्यामुळे वाहन जातपर्यंत अनेक नागरिकांना रस्त्याच्या कडेला थांबून राहावे लागते. हा रस्ता एकेरी असल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तरी संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनधींनी लक्ष घालून रस्त्याची दुर्दशा दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.