गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या नळधारकांची आर्थिक लूट सुरू आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला १९ आॅक्टोबर रोजी एक निवेदन दिले व त्यांच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना देण्यात आले आहे. मात्र यावर कार्यवाही थंड बस्त्यात असल्याचे दिसत आहे.सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक वर्षाआधी विद्युत बिलाअभावी बंद पडली होती. बंद पडलेली योजना ५ मे २०१५ रोजी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने स्वत:कडे हस्तांतरीत केली. तर योजना समितीने देखभाल व दुरुस्तीकरिता खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकडे दिले. तेव्हापासून विद्युत बिल व फुटतूट दुरुस्तीचे खर्च जिल्हा परिषद वहन करते. पाणीपट्टी वसुली मात्र अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या पावत्यांनी होत आहे. योजनेकडे एक हजार ३०० नळ कनेक्शन आहेत. तर नळधारकांकडून दरमहा ८० रुपयांप्रमाणे पाणीपट्टी वसुल केली जात आहे. त्यानुसार मासीक वसुली एक लाख चार हजार रूपये होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर ४० हजार रूपये खर्च झाल्यास ६४ हजार रुपये मासिक बाकी राहतात. मात्र या उरलेल्या रकमेचा हिशोबच नाही अशी लूट सुरू आहे.वास्तविक जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीने योजना चालविण्यासाठी निविदा काढायला हवी होती. तसे न करता सरळ खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाकडे देण्यात आले. अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक मंडळाने एका निवेदनाद्वारे मागणी केले मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शर्मा यांच्याशी संपर्क केला असता ३१ डिसेंबर रोजी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा आहे. त्यात हा विषय ठेवला जाईल, असे त्यांनी भ्रमणध्वनीवरुन सांगितले. (वार्ताहर)
नळधारकांची आर्थिक लूट
By admin | Published: December 11, 2015 2:20 AM