गोंदिया : विदर्भ साहित्य संघ, गोंदियातर्फे (दि.२०) जुलै रोजी भवभूती रंगमंदीरात वसंतराव मातुरकर ऋतुराज स्मृतीत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी ध.ग. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली संचालक कवी रमेश शर्मा यांनी एकेका कवीला मोठ्या खुबीने पाचारण करीत या मैफलीत रंगत आणली.नवेगावबांधचे कवी के.ए. रंगारी यांनी सर्व शिक्षा अभियानाचा महिमा व्यक्त केला तर चैतन्य मातुरकर यांनी ‘पावसारे पावसारे, धावणारे धावणारे’ चिमुकल्यांना भावणारा पाऊस, तरुणाईच्या मनातील पाऊस, वयस्कांच्या स्मरणातील पाऊस, शेतकऱ्यांच्या आयुष्याला स्पर्शणारा पाऊस अशा रिमझिम सरी सुरू होत्या. शशी तिवारी यांनी ‘ये सावनकी रिमझिम फुहार अंग थिरले ज्यो नदिया की धार’ असा अनुभव त्याना देऊन दाद मिळविली. छगन पंचे यांनी आपल्या गझलेतुन जिंदगी का कोई भरोसा नही है यारो, न जाने कब दिखादे अंगुठा, या वास्तवाची जाणीव करुन दिली. शहिद अन्सारी शफफ यांनी कौन पुछे तेरा हाल ए गम, सब के दामन है अश्को से नम, रमेश शर्मा यांनी पुनित यावन प्रीत का सर्जन करुंगा, प्यार के अहसास का दर्पण बनूंगा अशा काव्य पंक्तितुन माणुसकी उजागर केली. युवराज गंगाराम, वायू इसमकर, विजय मेश्राम, मनोज बोरकर, विशाल बोरकर, सुरेंद्र जगने, मुन्ना नंदागवळी, माणिक गेडाम यांनीही आपल्या कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे अध्यक्ष ध.ग. मेश्राम, यांनी सामाजिक जाणिवेला हात घालणारी कविता ऐकविली. प्रारंभी वर्षा मातुरकर आणि मान्यवरांच्या हस्ते महाकवी भवभूती आणि स्व. वसंतराव मातुरकर यांच्या श्रद्धांजली अर्पण केली. विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रदीप व्यवहारे यांनी सर्व अतिथी व कवींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन माणिक गेडाम तर आभार कार्याध्यक्ष यशवंत सरुरकर यांनी मानले. आयोजनासाठी रवी राठोड, बाबलीन चटर्जी, भौमिक, मनोज जोशी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
रिमझिम पावसातही बहरले कवी संमेलन
By admin | Published: July 23, 2014 11:41 PM