गोंदिया : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिंदीबिरी येथील एका २३ वर्षाच्या तरुणीसोबत मोबाईलवर संपर्क साधून लग्न जोडणाऱ्या नागपूरच्या तरुणाने रीतिरिवाजाप्रमाणे लग्न जोडले. परंतु हुंड्याची मागणी केली. परंतु मुलीकडून हुंडा देण्यास असमर्थता दाखविल्याने त्यांनी लग्न मोडले. त्या लग्न मोडणाऱ्या मुलासह तिघांवर चिचगड पोलिसात २१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु त्यांना अटक झाली नाही.
आरोपी रवींद्र चंद्रभान नवडेती, सुरेखा चंद्रभान नवडेती, रा.जलाखेडा नागपूर व शारदा शिवशंकर वाढिवे, रा. थूल ले-आऊट संदेशनगर काटोल, नाशिक या तिघांविरुद्ध हुंडाबळी अधिनियम १९६१ कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. साक्षगंधात झालेला खर्च १ लाख ५० हजार रुपये ते स्वत:हून देण्यासाठी तयार झाले. तरुणीवर दबाव टाकून तिची व मुलीच्या वडिलांची बळजबरीने स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. या कामात चिचगड पोलीसही हलगर्जी करीत असल्याची तक्रार त्या मुलीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. पोलिसांनी चार्जशीट तयार करून न्यायालयात दाखल करत नसल्याने व मी कंटाळून गेली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करण्याचा इशारा त्या तरुणीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.