आमगाव पोलिसांचे कृत्य : विभागाची पत घालविण्याचा प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर परवाना धारक दारू व्यवसाईकांचे धाबे दणानून सुटले आहे. या निर्णयानंतर मात्र अवैध दारू व्यावसायीकांना सुगीचे दिवस आले आहे. या अवैध व्यवसायाला संरक्षण मिळविण्यासाठी स्वत: पोलीस कर्मचारी पुढे येत असल्याने या अवैध व्यवसायाला चालना मिळत आहे. आमगाव तालुक्यातील मुख्यालय परिसरात परवाना धारक बार व रेस्टारेंट दहा, देशी दारु दुकाने चार तर वाईन विक्री केंद्र एक असे एकूण दारु विक्रीचे १५ दुकाने दारु व्यवसायातून कोट्यावधीची वार्षिक उलाढाल करायचे. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर या विक्री केंद्राना टाळे जडण्यात आले. तालुक्यातील मद्य पिणाऱ्यांची अधिक संख्या असल्याने व्यवसायाला रंगत चढली होती. परंतु मद्यविक्री बंद पडल्याने मद्य शौकीनांचा हिरमोड झाला. याच व्यवसायाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून अवैधपणे मद्य विक्रीचा व्यवसाय गल्लोगल्लीत वाढायला लागला. या अवैध व्यवसायाला आळा बसविण्यासाठी ज्या विभागावर जबाबदारी घालण्यात आली तेच लोक या अवैध व्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व शांतता ही पणाला लागली आहे. आमगाव तालुक्यात अवैधपणे दारू विक्रीसाठी प्रत्येक गावात टोळी सक्रीय झाली आहे. राज्य सिमेपलिकडून अवैध दारूचा महापूर तालुक्यात येत आहे. मद्य शौकीनांचा कंठ शमविण्यासाठी काही पोलीस विभागातील कर्मचारी संरक्षण मिळवून देत आहेत. त्यामुळे आमगाव तालुक्यात अवैध विक्रीचा व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. आमगाव पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यक्तींची शाळा निर्जन वनात भरविली होती. या वन शाळेत वनभोजनसह पोलिसांचा पाहूणचार कसा घडणार यावर बळ देण्यात आला. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे मनसुबे अधिक कठोर झाले आहे. त्यामुळे परवानाधारक दुकाने बंद पाडून संपूर्ण गाव दारुबंदीसाठी लढा देणाऱ्या महिलांपुढे अवैध दारू विक्री करणे एक आव्हाणच आहे. पोलीस विभागातील काही कर्मचारी या अवैध व्यवसायाला साथ देत आहेत. अवैध दारूविक्रेत्यांकडून अधिक रक्कम कमविण्याच्या नादात पोलीस विभाग आपली पत घालवित आहेत.
अवैध दारूविक्रेत्यांसोबत पोलिसांचे वनभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 1:13 AM