देवरी पोलिसांची पेट्रोलिंग : गावकऱ्यांना मिळाला दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यात ‘चोर आला रे आला’ची चर्चा सुरु असताना शुक्रवारी कोहडीपार व शनिवारी शेंङा येथे चोरांचा धुमाकुळ या आशयाची बातमी ‘लोकमतने’ प्रकाशित केली होती. याची तात्काळ दखल देवरी पोलिसांनी घेतली व रात्री १२ च्या सुमारास पेट्रोलिंग सुरु केली आहे. त्यामुळे चोरांची भंबेरी उडाली असून गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चोर असल्याची अफवा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असतानाच परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातल्या त्यात शुक्रवारी कोहडीपार व शनिवारी रात्री शेंड्यातील घटनेने गावकरी अधिकच धास्तावले होते. परंतु आजपावेतो या परिसरात एकही चोरीचे प्रकरण उजेडात आले नाही. त्यामुळे ते चोर आहेत की कोण? हे सांगता येणे कठीण आहे. चोरीचे प्रकरण पोलिस विभागाच्या कक्षेत येत असल्याने पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यावर देवरी पोलिसांनी रात्रीच्या वेळेस शेंडा परिसरात पेट्रोलिंग सुरु केली. त्यामुळे चोरट्यांवर नक्कीच धक्का बसेल व गावकऱ्यांमध्ये दशहत राहणार नाही यात दुमत नाही. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मात्र जनतेने सुद्धा पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या चोर या गावी आले होते त्या गावी आले होते अशीच अफवा सुरु आहे. मात्र या परिसरात एकही घरची चोरट्यांनी चोरी करुन माल पळविला आहे असे प्रकरण समोर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनोळखी महिला किंवा पुरुष चोर अथवा प्रवासी याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
पोलिसांच्या गस्तीने चोरांची उडाली भंबेरी
By admin | Published: June 11, 2017 1:15 AM