गोंदिया : चारचाकी वाहनाच्या विमा दाव्यासाठी लागणारी एनसीआर प्रत व पंचनामा देण्यासाठी १५०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया पोलीस हवालदारास येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सालेकसा येथे सोमवारी (दि.१७) दुपारी ही कारवाई केली. रमेश श्रीराम बिसेन (५०) (ब.क्र.११७९) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या मालकीचे चारचाकी वाहन असून ते गरजेनुसार भाड्याने देतात.२४ मे रोजी तक्रारदार आपली गाडी लग्नाच्या वरातीसाठी भाड्याने घेवून ग्राम पठाणटोला येथे स्वत: गेले होते. तेथे काही अनोळखी व्यक्तींच्या भांडणात तक्रारदार यांच्या वाहनासह अन्य चार-पाच वाहनांची तोडफोड झाली. यावर त्यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र तक्रारदारांना विमा दावा करावयाचा असल्याने त्यांना एनसीआर प्रत व पंचनाम्याची गरज होती. यासाठी ते सालेकसा पोलीस ठाण्यात हवालदार बिसेन यांच्याकडे गेले.मात्र हवालदार बिसेन यांनी एनसीआर प्रत व घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी गुरूवारी (दि.१३) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी करून सोमवारी (दि.१७) सालेकसा पोलीस ठाणे येथे सापळा लावला. यात हवालदार बिसेन याने दोन हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती एक हजार ५०० रूपये पंचासमक्ष घेतले. यावर पथकाने त्यांना रंगेहात पकडले असून सालेकसा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ (सुधारीत कायदा २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.