देवरी : देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असून ते २४ तास आपले कर्तव्य बजावतात. म्हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असो अथवा पोलीस त्यांना नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता पोलीस-नागरिक संवाद आवश्यक आहे, अशी अपेक्षा ठाणेदार रेवचंद सिगंनजुडे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी शहरात रोज सायंकाळी गस्त सुरू केली असून या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधून घेत आहेत.
शहरात दररोज सायंकाळी रूट मार्च करून शहरातील नागरिकांशी संवाद साधून लोकांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती दूर करून, शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणणे, कोरोनाचा काळ पाहता व्यावसायिकांच्या दुकानात होत असलेली गर्दी कमी करणे, नागरिकांत पोलिसांबद्दल भीती न राहता प्रत्यक्षपणे येत असलेल्या अडचणी नागरिकांनी पोलिसांना सागांव्या याकरिता शहरात मागील ४ दिवसांपासून ते प्रत्येक गल्लीतील छोट्या-मोठ्या दुकानदारांसह नागरिकांना रूट मार्चच्या माध्यमातून भेटत आहेत.
शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी, जुगार, अवैध दारू विक्री वाढली होती. परंतु ठाणेदार सिंगनजुडे येताच त्यांनी सातत्याने केलेल्या व होत असलेल्या कार्यवाहीमुळे गुन्हेगारीवर आळा बसला आहे. त्यांनी नागरिकांना आपला मोबाइल क्रमांक दिला असून त्यावर २४ तास सेवा पुरविण्यात येणार असल्याचेही सांगीतले आहे. यामध्ये नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करण्याची गरज असल्याचे ठाणेदार सिंगनजुडे यांनी म्हटले आहे.