केशोरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोरोनाचा फैलाव कसा रोखता येईल यासंबंधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप इंगळे यांनी शुक्रवारी (दि. २) पत्रकार परिषद घेऊन आरोग्य विभागाच्या मदतीला ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आरोग्य विभागाच्या मदतीला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन सरपंच नंदू पाटील गहाणे, ग्राम विस्तार अधिकारी कुंडलिक कुटे आणि स्थानिक पत्रकार लोकमतचे चरण चेटुले, लोकमत समाचारचे प्रकाश वलथरे, अनिल लाडे, चेतन समरीत प्रामुख्याने उपस्थित होते. यावर अनेकदा सूचना देऊनही कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येते, तेव्हा केलेल्या कारवाईचा चुकीचा संदेश जाऊ नये यासंबंधी प्रामुख्याने असे ठाणेदार इंगळे यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गावर आळा कसा बसविता येईल. गावात होणारे लग्नसभारंभ कोरोनाचे नियम पाळून फक्त ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत आटोपणे, अंत्यविधी कार्यक्रमात २० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहणार नाही, अशा विविध सूचनासह गावातील व्यापारी प्रतिष्ठाने, भाजीपाला विक्रेते बाजाराच्या दिवशी शेतमालाची विक्री करू शकतील. पण कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. बाहेरील भाजी विक्रेत्यांना बाजारात येण्यास बंदी राहणार आहे. यासंबंधीची सूचना ग्रामपंचायतने जारी करावी. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केशोरीसह परिसरातील जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी आता पोलिसांची नजर असल्याचे ठाणेदार संदीप इंगळे यांनी सांगितले.