देऊळगाव खून प्रकरण : खऱ्या मारेकऱ्याचा संभ्रम लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : जमीन खरेदी-विक्री सौद्यातून देऊळगाव-बोदरा येथे झालेल्या शिवलाल नारायण भांडे (४३) यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या आठ आरोपींना न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.३) पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नी मंदा भांडे (३०) हिच्या लेखी रिपोर्टवरुन गावातील आठ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी २९ मे पर्यंत आरोपींचा पीसीआर घेण्यात आला होता. सदर कालावधीत खूणाच्या आरोपाखाली पोलीस ताब्यात असलेल्या आरोपीकडून खूनाच्या प्रकरणासंबंधी कोणताही उलगडा वा माहिती मिळाली नाही. सोमवार (दि.२९) ला त्या आठही आरोपींना सडक-अर्जुनी येथील न्यायालयात सादर केलेअ सता न्यायालयाने तपासी पोलीस अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव-बोदरा येथील शिवलाल भांडे यांचा मृतदेह घराच्या खोलीत २४ मे रोजी सकाळी दिसून आला होता. पतीचा खून करण्यात आला असून जमिनीच्या खरेदी-विक्री सौद्यातून गावातीलच देवानंद झोळे (३५), दिनेश झोळे (२९), अंताराम झोळे (५९), प्रभु झोळे (३४), हेमराज बोरकर (४३), माधोराव झोळे (४५), रेखा झोळे (४०), रितेश झोळे (२३) यांनी संगणमतानी केला अशी लेखी फिर्याद मृतकाची पत्नी मंदा भांडे यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशनला नोंदविली होती. त्यावरुन अ.क्र.२६/०१७ कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून २४ तारखेला पोलिसांनी त्यांना अटक केली होती. पहिल्या प्रथम २९ तारखेपर्यंत आरोपींचा पीसीआर घेण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपींचे कपडे, रक्ताचे-केसांचे व नखांचे नमूने तपासणीसाठी उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. खूनाच्या गुन्ह्यासंबंधी सखोल उलगडा होण्याच्या संबंधाने व गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अटकेत असलेल्या आठही आरोपींची पोलीस कोठडी शनिवारपर्यंत (दि. ३) वाढवून देण्याची मागणी सपोनि अनिल कुंभरे यांनी न्यायालयाला केली. पोलिसांची बाजू ऐकून सडक-अर्जुनी न्यायालयाने आठही आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘त्या’ आठही आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: June 01, 2017 12:59 AM