गोंदिया : कोविडमुळे किंवा अन्य कारणाने गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत होऊन आलेल्या बालकांना शोधण्याची मोहीम गोंदिया पोलीस विभागानेही राबविली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलिस विभागाला २७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्यात शोध मोहीम राबवून ४४ कुटुंबांना भेटी दिल्या. या भेटीत ३२ मुले ही स्थलांतरीत असलेली आढळली आहेत. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आता शिक्षण विभाग प्रयत्न करणार आहे.
गोंदिया जिल्हयात इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या अस्थायी कुटुंबाच्या बालकांना नियमित शाळेत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहे. शाळाबाहय विद्यार्थ्यांमध्ये स्थलातर हे प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात काही कामानिमित्त अस्थायी कुटुंब येत असतात. या कुटुंबासोबत ६ ते १४ वयोगटातील शाळाबाहय बालके असल्यास आरटीई कायद्यानुसार त्यांना नियमित शाळेत दाखल करणे आवश्यक आहे. परंतु अस्थायी कुटुंब हे स्थलांतर करीत असतांना कळवित नाही. स्थलांतर होणाऱ्यांची माहिती मिळत नाही. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील बालक हे शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. यासाठी शिक्षण विभागाने गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत गोंदिया जिल्ह्यात इतर जिल्ह्यातृून किंवा राज्यातून येणाऱ्या अस्थायी कुटुंबाची माहिती मागविण्यात आली होती. अश्या ३२ अस्थायी मुलांची यादी पोलीस विभागाने शिक्षण विभागाला दिले आहे. त्या बालकांना नजीकच्या शाळेत दाखल करुन शिक्षण हमी पत्रक देण्यात यावे,असे पत्र व यादी पोलीस विभागाने शिक्षण विभागाला दिले आहे.