ऐच्छिक रक्तदान मोहीम : २५ जणांनी केले रक्तदानगोंदिया : महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत सध्या ऐच्छीक रक्तदान जनजागरण मोहीम सुरू आहे. त्यानिमित्त मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये गोंदिया शहरातील पोलीस उपअधिक्षक (गृह) सुरेश भवर यांनी स्वत: सर्वप्रथम रक्तदान करून तरुणांपुढे रक्तदानाचा एक आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे देवरी उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांनी देखील आपला २५ सहकाऱ्यांसोबत रक्तपेढीत येऊन ऐच्छीक रक्तदान शिबिरात स्वइच्छेने उस्फूर्त रक्तदान केले. बाई गंगाबाई रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश भवर, पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र व डोनर कार्ड देऊन सत्कार केला. याप्रसंगी गोसावी यांनी युवकांना आवाहन केले की, निरोगी युवक दर तीन महिन्याला रक्तदान करू शकतो. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. पोलीस विभागाप्रमाणेच इतर सरकारी विभागातील निरोगी व्यक्तींनी देखील नियमित रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. सर्व रक्तदात्यांचे आभार हुबेकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
रक्तदानात पोलिसांचा पुढाकार
By admin | Published: October 08, 2015 1:31 AM