गोंदिया : आंबाटोला जंगल परिसरात रविवारी (दि. २१) सकाळी आठ वाजता नक्षल व पोलीस चकमक झाली. दरेकसा दलम तसेच प्लाटून ५५ दलमच्या १८ ते २० नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.
सालेकसा परिसरातील हाजराफाॅल, कोपालगड, मरामजोब, महामाया पहाडी टॉवर लाईन भागांत नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती सालेकसाचे ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांना मिळाली होती. यावर त्यांनी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत योजना आखून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे विशेष अभियान पथक सालेकसामधील तुरकर पथक, नवेगाव बांध येथील कांटगे पथक व बीडीडीएस पथक यांनी जंगलात सर्च अभियान राबविले. आंबाटोला जंगल परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान पोलीस पथकास समोरून अंदाजे ५० मीटर अंतरावर भारत सरकार प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेचे १८ ते २० सशस्त्र नक्षलवादी महिला-पुरुष येताना दिसले. पोलिसांकडून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले; परंतु सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर जीव घेण्याचे उद्देशातून गोळीबार सुरू केला. यात पोलिसांनी आत्मरक्षणार्थ उत्तर म्हणून गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. घटनास्थळाची शोधमोहीम सुरू असून दरेकसा दलम तसेच प्लाटून ५५ दलमच्या १८ ते २० नक्षलवादी आरोपींविरुद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे तपास करीत आहेत.