गोंदिया : महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य भवन नागपूर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पोलीस पाटलांकरिता राज्यपाल पुरस्काराची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
निवेदनातून महाराष्ट्रातील पोलीस पाटील राज्यपाल यांच्या अधीनस्त कार्यरत आहेत. त्यामुळे संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून निवेदन दिले. यामध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण व तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सन २०११ मध्ये पोलीस पाटलांकरिता राज्यपाल पुरस्काराची परंपरा सुरू केली होती. परंतु, मागील अनेक वर्षांपासून राज्यपाल पुरस्कारांंची परंपरा बंद करण्यात आली. ती परंपरा पुन्हा सुरू करावी, तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटलांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्यांना सेवानिवृत्तीची योजना सुरू करावी. कोरोना संक्रमणकाळात कर्तव्य बजाविताना राज्यातील १५ पोलीस पाटलांचा मृत्यू झाला. त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी व कोरोना संक्रमित पोलीस पाटलांचा उपचाराचा वैद्यकीय खर्च देण्यात यावा. राज्यपालांनी पोलीस पाटील हे गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे कार्य करतात. त्यामुळे ग्रामीण परिसरातील कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे पोलीस पाटलांनी जबाबदारीचे भान ठेवून निर्भयपणे कार्य करावे. त्यांना पुरस्कार देऊन सम्मानित करणे गौरवाची बाब असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, शरद पाटील ब्राह्मणवाडे, विजय घाडगे, मुरारी दहिकर यांचा समावेश होता.