देवरी : शहरातील सुरभी चौकातील एका घरात जुगार खेळत असलेल्या सहा जणांना सोमवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये दोन शिक्षक व दोन तलाठ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याकरिता अनेकांचा दबाव पोलिसांवर येऊनसुद्धा पोलिसांनी या शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करीत कायदा सर्वांसाठी सारखाच असतो हे दाखवून दिले.
सुरभी चौकात गणेश कराडे यांच्या घरी सुटीच्या दिवशी शासकीय कर्मचारी जुगार खेळतात ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कराडे यांच्या घरी सोमवारी धाड टाकली. त्यावेळी तलाठी प्रकाश चव्हाण व सचिन तितरे, शिक्षक लोकनाथ तितराम व सुनील कांबळे तसेच सुरेंद्र कान्हेकर आणि गणेश कराडे जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५९,८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहायक निरीक्षक घाडगे, पोलीस हवालदार करंजेकर, गायधने, न्यायमूर्त, मडावी यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरवासीयांनी देवरी पोलिसांची प्रशंसा केली आहे. विशेष म्हणजे, जुगार खेळताना शासकीय कर्मचारी रंगेहात सापडल्याने शहरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.