लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील नवीन बायपास मार्गावरील मैदानावर भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आटोपून सालेकसा येथे परत जात असलेल्या पोलिसांची बस उलटली, यात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.३) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गोंदिया आमगाव मार्गावरील ठाणा गावाजवळ घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी गोंदिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची जाहीर सभा असल्याने त्यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यातील पोलिसांची डयुटी लावण्यात आली. बसमध्ये पुणे येथील ग्रुप-डी चे पोलीस कर्मचारी होते. जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री सभा संपल्यानंतर पोलीस ठाण्याकडे परतत असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गोंदिया ते आमगाव रस्त्यावर अचानक बस उलटली. या बसमधून जवळपास २६ ते २७ पोलीस कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्व पोलीस सालेकसा पोलीस ठाण्यात जात होते. पुण्यावरु न निवडणुकीच्या काळात सुरक्षेसाठी त्यांची या भागात नियुक्ती करण्यात आली असल्याचीे माहिती आहे.
पोलीस वाहन उलटून ११ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 8:52 PM