गोंदिया : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकललेली गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक अद्यापही जाहीर झालेली नाही. पण त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे. निवडणूक जेव्हा जाहीर होईल तेव्हा होईल पण त्यापूर्वी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वच पक्षात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. शनिवारी (दि.१९) रोजी माजी आ. दिलीप बनसोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर रविवारी गोंदिया येथील काँग्रेसचे सुनील भालेराव, विशाल शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे.
गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला पूर्ण झाला. पण कोरोनाचा संसर्ग असल्याने निवडणूक आयोगाने जि.प.च्या निवडणुका पुढे ढकलल्या हाेत्या. त्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यापासून निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या जाहीर करणे आणि सर्कल निहाय आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सर्कलनिहाय आरक्षणाची अंतिम सुनावणीची प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा टप्प करण्यात आली. त्यामुळे राजकीय हालचाली सुध्दा थंड झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून जिल्हा अनलॉक झाला आहे. तर शासनाने निवडणुका घेण्याससुध्दा परवानगी दिली आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकीला घेऊन राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आतापासून आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. तर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मतदारसंघात सक्रिय झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने झेडपी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी फोडफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे.
.................
नेत्यांचे वाढले मतदारसंघात दौरे
जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेले नाही. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचे जिल्ह्यात दौरे वाढूृ लागले आहे. कोरोनामुळे जाहीरसभा न घेता गावातील एखाद्या प्रमुख कार्यकर्त्याच्या घरीच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधृून त्यांना झेडपी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात नेते अधिक सक्रिय दिसून येत आहे.
............
सर्वांचा एकला चलो रे चा नारा
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी या तीन पक्षांच्या नेत्यांकडून स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपल्या उमदेवारांची चाचपणी करणे सुरू केले आहे.
....................
असे आहे समीकरण
गोंदिया जिल्हातील ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या १० लाख ८२ हजार २७० आहे. यात एससी १ लाख ३२ हजार ८८ आणि एसटीची लोकसंख्या १ लाख ९८ हजार १९५ आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागा आहेत. जि.प.च्या एकूण जागांचे सर्कल निहाय समीकरण पाहता जनरलच्या एकूण २३ जागा राहणार असून यापैकी १२ जागा महिलांसाठी राखीव, एससीच्या ६ जागा, यापैकी ३ जागा महिलांसाठी राखीव, एसटीच्या एकूण १० जागा यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव, तर ओबीसीच्या एकूण १४ जागा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात ओबीसीच्या जागा कमी करून जनरलच्या जागा वाढविल्या आहे. त्यामुळे आता जनरलच्या एकूण ३७ होणार असून यापैकी २७ जागा या महिलांसाठी राखीव असतील.
.............