नरेश रहिले
गोंदिया : गोरगरिबांच्या मुलांना शाळेत जाताना हिन भावना येऊ नये, श्रीमंताची मुले नवीन कपड्यात आणि गरीबांची मुले जुन्या कपड्यात अशी विषमता विद्यार्थ्यांत होऊ नये म्हणून गणवेशात शाळेत बोलावले जाते. शासनाकडून वर्ग १ ते ८ वी च्या सर्व मुलींना तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील मुलांना गणवेशाचा लाभ देण्यात येतो. दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जात होते. परंतु यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला जात आहे. गोंदियात जिल्ह्यातील ७५ हजार ९५८ विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. या गणवेशापोटी शासनाने २ कोटी २७ लाख ८७ हजार ४०० रुपये गोंदिया जिल्हा परिषदेला दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४० हजार २४ मुली व ३५ हजार ९३४ मुलांना गणवेशाचा लाभ मिळत आहे. गणवेशाचे आलेले पैसे जिल्हा परिषदेकडून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वळते करण्यात आले आहे. एका गणवेशामागे ३०० रुपयांप्रमाणे पैसे शाळांना देण्यात आले. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने एकच गणवेश दिला जात आहे; परंतु एका गणवेशापोटी शासनाने ३०० रुपये दिले आहेत. मात्र, त्या तीनशे रुपयांतच आयएसआय नामांकन असलेलेच कापड गणवेशासाठी वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरवर्षी गणवेशाच्या रकमेतून काटकसर करून काही शाळा व्यवस्थापन समित्या पैसे मागण्यासाठी मुख्याध्यापकांवर दबाव आणत होते; परंतु यंदा एकाही मुख्याध्यापकांच्या यासंदर्भात तक्रारी नाहीत.
.................................
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा -१०६५
एकूण विद्यार्थी- ७५९५८
मुले-३५९३४
मुली- ४००२४
जि.प.ला प्राप्त निधी- २२७८७४००
लागणारे गणवेश- ७५९५८
............................
गणवेशासंदर्भात तक्रारी
१) ३०० रुपयात आयएसआय नामांकन असलेले गणवेश कसे उपलब्ध करून देता येईल.
२) कोरोनाच्या संकटामुळे दोन गणवेशांऐवजी एकच गणवेश देण्यात आला आहे.
३) कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आता गणवेश विद्यार्थ्यांना घरी नेऊन वाटप करावे लागणार आहे.
४) शाळा व्यवस्थापन समित्यांचा हस्तक्षेप कमी झाल्याचे यंदा लक्षात येतो.
.........
कोट
शासनस्तरावरून आलेल्या सर्व सूचनांचे पालन गोंदिया जिल्ह्यात होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. लागणारा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वळविले गेले आहे. विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश दिले जाणार आहे.
- राजुकमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया
..........................
लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश घरपोच देण्यात येईल. शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीने सर्व लाभार्थ्यांना उत्तम दर्जाचे गणवेश आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत.
-शरद उपलपवार, मुख्याध्यापक