गोंदिया : मागील पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाॅलिटेक्निकच्या प्रवेशाकडे कल वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात शासकीय पाॅलिटेक्निक कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात या अभ्यासक्रमासाठी जाण्याची पायपीट कमी झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाॅलिटेक्निकच्या ॲडमिशनवर याचा काहीसा परिणाम झाला होता. त्यामुळे आतापर्यंत केवळ १२८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते; मात्र शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पाॅलिटेक्निकच्या प्रवेशाला गती देण्याची शक्यता आहे. गोंदिया येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या एकूण ३६० जागा आहेत. त्यासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला ३० जूनपासून सुरुवात झाली असून, २३ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करण्याची मुदत होती; मात्र काही तांत्रिक बाबींची अडचण लक्षात घेता पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख वाढण्याची शक्यता आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक कॉलेजमुळे अभ्यासक्रमाच्या नवीन संधीसुद्धा विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत. एकंदरीत आता पाॅलिटेक्निच्या मिशन ॲडमिशनला गती आली आहे.
..................
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेज : १
एकूण प्रवेश क्षमता : ३६०
आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज : १२८
................
अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै
पॉलिटेक्निकच्या प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात ३० जूनपासून सुरुवात झाली होती; मात्र दहावीचा निकाल जाहीर झाला नव्हता, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला फारशी गती प्राप्त झाली नव्हती, तर २३ जुलै ही प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे; मात्र विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रवेश अर्ज करण्याच्या तारखेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचे पॉलिटेक्निक कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
.................
निकालामुळे बैठक क्रमांकाची अडचण दूर
दहावीचे निकाल जाहीर झाले नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक टाकण्याची अडचण निर्माण झाली होती; मात्र आता निकाल जाहीर झाला असून, गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत. त्यामुळे बैठक क्रमांक टाकण्याची समस्या आता दूर झाल्याने विद्यार्थ्यांचीसुद्धा मोठी अडचण दूर झाली आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे टीसी उपलब्ध नसेल त्यांना प्रपत्र एन भरुनसुद्धा प्रवेश घेता येणार आहे.
..................
गेल्या वर्षी दहा टक्के जागा रिक्त
मागील वर्षी येथील पॉलिटेक्निकच्या विविध अभ्यासक्रमांच्या एकूण १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याने या जागा रिक्त राहिल्या होत्या; मात्र विद्यालयाच्या एकूृण ३६० जागांपैकी फारच मोजक्या जागा रिक्त होत्या. अलीकडे पाॅलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
....................
दहावीच्या निकालानंतर येणार गती
- मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकालाबाबत निश्चितता नव्हती, त्यामुळे प्रवेशाला घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते.
- शुक्रवारी (दि.१६) दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचे हे निश्चित झाले आहे.
- त्यामुळे आता पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला गती मिळण्याची शक्यता आहे, तसेच पालकदेखील आता निकालानंतर पाल्यांना कुठल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, हा निर्णय घेण्यास मोकळे झाले आहे.
.................
कोट
३० जुलैपासून पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. मागील दोन-तीन वर्षांचा अनुभव पाहता पाॅलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. पॉलिटेक्निकनंतर विद्यार्थ्यांना अनेक संधीदेखील आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घ्यावा.
- चंद्रहास गोडघाटे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया.
............
विद्यार्थ्यांच्या अडचणी काय...
कोरोनामुळे यंदाही अभ्यासक्रम प्रत्यक्षात सुरू होणार की नाही, याबाबत शंका होती. शिवाय दहावीचा निकालसुद्धा जाहीर झाला नव्हता, त्यामुळे प्रवेश कसा करावा, हा प्रश्न होता; मात्र आता निकाल जाहीर झाल्याने सर्वच अडचणी दूर झाल्या आहेत.
- तुषार चव्हाण, विद्यार्थी.
...................
दहावीचा निकाल जाहीर झाला नव्हता, त्यामुळे पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी अर्ज करताना अडचण येत होती; पण दहावीच्या निकालानंतर आता मार्ग सुकर झाला आहे. केवळ आता टीसीची अडचण येऊ शकते.
- विशाल समरीत, विद्यार्थी.
..........................