गोंदिया : पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परंतु, दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला नाही. त्यामुळे आतापर्यंत ८० विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील पॉलिटेक्निकच्या प्रथम व थेट द्वितीय पदविका प्रवेशप्रक्रियेस ३० जूनपासून ई-स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दहावीनंतर प्रथम वर्षाला प्रवेश दिला जातो.
पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला व त्यामुळे आता प्रवेशाला सुरुवात होणार आहे. दहावीचा निकाल लागला नव्हता तरीदेखील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होती. जिल्ह्यातील जवळपास ८० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यासक्रमासाठी अर्ज भरला आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ जुलै असून, आणखी १३ दिवसांचा कालावधी आहे. दहावीचा निकाल लागल्याने आता प्रवेशप्रक्रियेला वेग येणार आहे.
..................
आता येणार प्रवेशाला गती
-दहावीचा निकाल १६ जुलै रोजी लागल्याने आता पॉलिटेक्निकला प्रवेश होणार आहे. निकालाची प्रतीक्षा असल्यामुळे पॉलिटेक्निककरिता प्रवेश झाले नाही.
-यंदा आतापर्यंत दोन कॉलेजमधून ८० अर्ज करण्यात आले आहे. आता दहावीचा निकाल लागल्याने प्रवेशप्रक्रियेला गती येणार आहे.
......................
मागील वर्षी जागा होत्या रिक्त
मागील वर्षी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचे अर्ज सादर करण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ५० टक्के जागा रिक्तच होत्या. परंतु यंदा पूर्ण जागा भरल्या जातील, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
........................
विद्यार्थ्यांची गैरसोय टळली
-पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला दहावीनंतर व थेट द्वितीय वर्षाला बारावीनंतर प्रवेश दिला जातो. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पॉलिटेक्निकला पसंती देतात.
-प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थी गोंधळतात व अप्लिकेशन क्रमांकावरून अर्ज स्वीकारले जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे.
............................
विद्यार्थ्यांच्या अडचणी काय?
१) पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया कशी आहे याची माहिती घेतली आहे. आता निकाल लागल्याने प्रवेश घेण्याच्या तयारीला लागणार आहे.
- स्मीता हुकरे, विद्यार्थिनी
२) पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी विविध कागदपत्र लागत आहेत. ही कागदपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. कागदपत्र लवकर देण्याची व्यवस्था झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
अजय शेंडे, विद्यार्थी
........................
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक-०२
एकूण प्रवेशक्षमता- ४२०
आतापर्यंत गेले अर्ज-८०
अर्ज भरण्याची अखेरची मुदत-२३ जुलै