सुकडी-डाकराम : आदिवासी व नक्षलग्रस्त जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेझरी बालापूर ते सुकडी-डाकराम रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आदिवासीबहुल क्षेत्र व नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त क्षेत्र ओळखला जाणारा आलेझरी-बालापूर ते सुकडी-डाकराम हा मुख्य रस्ता संपूर्ण उखडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडाअंतर्गत या रस्त्याचे मागे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पण संबंधित विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका वर्षामध्ये या रस्त्यांची संपूर्ण गिट्टी उखडलली होती. संबंधित गावकऱ्यांनी अनेकदा याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली; पण त्या तक्रारीचा कोणताच फायदा झाला नाही. ज्यावेळी रस्त्याचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराने गावातील एक-दोन व्यक्तींना हाताशी धरून रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचे केली. त्यामुळे आजही या रस्त्यांची परिस्थिती एवढी दयनीय झाली की संपूर्ण गिट्टी उखडलेली आहे. या रस्त्याने चालता व सायकलही चालविता येत नाही. सुकडी-डाकराम हा मुख्य गाव असल्याने आलेझरी-बालापूर येथील दुर्लक्षित धोरणामुळे आज आदिवासी गाव विकासापासून कोसो दूर आहे. आठ दिवसांत या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू झाले नाही तर जि.प. व पं.स.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.