घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरुम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेली आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण अवस्थेत दिसत आहे. देव्हाडा या गावी एलोरा पेपर मिल आहे त्यामुळे अनेक कामगार पेपरमिलमध्ये रात्रीबेरात्री कामावर जातात. तसेच या रस्त्याने महाविद्यालयातील विद्यार्थी तुमसर येथे शिक्षण घेण्यास जातात. त्यांना कमालीचा त्रास सहन करून रस्ता पार करावा लागतो. तुमसर आगारची तुमसर ते तिरोडा व्हाया घाटकुरोडा मार्ग बससेवा सुरू होती; पण ही बससेवा रस्त्याअभावी बंद करण्यात आली आहे. या बसने अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी तिरोडा येथील महाविद्यालयात जात होते; पण बस बंद झाल्यामुळे सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.
या रस्त्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीच्या काठावर दोन रेती घाट आहेत, पण ते घाट यावेळी बंद आहेत. रेती घाट पुन्हा सुरू झाले तर रस्त्याची आणखीच वाट लागणार आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे पायी जाणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला थांबून आपला वेळ घालवावा लागतो. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनधींचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. घोगरा ते देव्हाडा रस्ता दुरुस्ती न झाल्यास घोगरावासीयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.