सुशिक्षित बेरोजगारांमध्ये वाढ
नवेगावबांध : जिल्ह्याच्या विकासाकडे जनप्रतिनिधी लक्ष घालत असल्याचे बोलले जात असले, तरी जिल्ह्यात आजही रोजगाराचा प्रश्न कायमच आहे. परिणामी जिल्ह्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची फौज तयार होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात रोजगार नसल्याने या बेरोजगारांना बाहेरची वाट धरावी लागत आहे.
धुळीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
तिरोडा : तुमसर-रामटेक-गोंदिया या राज्य मार्गाच्या दुपदरीकरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावर खोदकाम करून ठेवले असल्याने परिसरात धुळीचे प्रचंड लोट उठत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, नागरिक संतप्त झाले आहेत.
निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांची पायपीट
सालेकसा : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान अद्याप प्राप्त झाले नाही. यामुळे असहाय निराधार लाभार्थी अनुदानासाठी बँकेत पायपीट करीत आहेत. ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या निराधारांना आधार देण्यासाठी केंद्र शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत उपेक्षित निराधारांना दर महिन्याला बँकेमार्फत अनुदान राशी देण्यात येत आहे.
रस्त्याच्या कडेची झुडपे कापा
केशोरी : गोठणगाव ते केशोरी या जिल्हा मार्गाच्या कडेला झुडपे वाढल्यामुळे वळणावरून वाहने एकमेकांना दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या रस्त्यावरील वाढलेली झुडपे कापण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट जनावरे रस्त्यावर
गोरेगाव : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. शिवाय जनावरांना रस्त्यावर बांधले जात असून, त्यामुळे कित्येकदा अपघात होत असून नागरिकांना त्रास होत आहे. यावर नगर पंचायत तक्रारींची दखल घेत मोकाट जनावरांवर कारवाई करणार आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. वनविभागातर्फे कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याने जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.