प्रा. सागर काटेखाये
साखरीटोला (गोंदिया) : कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत या साधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांनी सर्वांत कमी किमतीचे पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले आहे. व्हेंटिलेटर खरेदी करणेसुद्धा सामान्यांच्या आवाक्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पोर्टेबल व्हेंटिलेटरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या मॉडेलला राज्य स्तरावर पार पडलेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांकसुद्धा मिळाला आहे.
गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. ते खरेसुद्धा आहे. विज्ञान युगात अनेक शोध लागले. जशी गरज पडली तसे नवीन साधनांचा शोध लागला. सन २०२० हे वर्ष जग कधीही विसरू शकणार नाही. कोरोनामुळे सगळे जग ठप्प झाले. अनेकांचा बळी कोरोनाने घेतला. जगात ४० लाख लोक मृत्युमुखी पडले. भारतही त्यातून सुटला नाही. भारतातसुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यावेळी कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली तसतसे सरकारी, खासगी रुग्णालये हाऊसफूल होऊ लागली. शासकीय यंत्रणेची धावपळ होऊ लागली. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात शासनाची दमछाक झाली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक जण मृत्यूच्या दारात गेले. पैशाअभावी काही गरीब लोकांना घरीच राहून जीव गमवावा लागला. ही भीषण परिस्थिती सगळ्यांनी अनुभवली. हीच बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसाला परवडेल व घरीच राहून स्वत:चा उपचार करता येईल व सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सर्वांत कमी किमतीचे पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले. या मॉडेलला आरडीनो किट, एम्बू बॅग, रॅक आणि पिनियम मेकॅनिझम, एलसीडी डिस्प्ले, ऑक्सिमीटर आदी साहित्य लावण्यात आले.
...............
व्हेंटिलेटरचे वजन केेवळ १ किलो
विशेषत: व्हेंटिलेटर केवळ एक किलो वजनाचे आहे. त्यामुळे त्यास सहज उचलून नेता येते. एका मिनिटात चार लिटर ऑक्सिजन सप्लाय करू शकते. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचविण्यात अतिशय फायदेकारक आहे. याला केवळ १२ व्होल्ट वीज लागते.
............
मोबाइल चार्जरवर चार्ज करणे शक्य
मोबाइल चार्जरवर व्हेंटिलेटर चार्ज होते. बॅटरीवरसुद्धा चार्ज होऊ शकते. याची किंमत केवळ सहा हजार सहासे पन्नास रुपये आहे. व्हेंटिलेटर तयार करण्यात हर्ष नरेश अग्रवाल, लीना पटले, दीपक कल्चर, प्रिया दावणे, विशाल सिंहमारे, सावित्री मच्छिरके या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. एसटी विसेंट पालोटी कॉलेज नागपूर येथे झालेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनीत हे व्हेंिटलेटर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
..........
हर्ष अग्रवालचा दुसरा प्रयोग
साखरीटोला येथील रहिवासी असलेला हर्ष अग्रवाल या विद्यार्थ्यांने यापूर्वी भंगारात पडलेल्या लुनापासून सिंगलसिट बाईक तयार केली होती. या बाईकची चर्चा सुध्दा महाराष्ट्रात सर्वत्र झाली होती. आता त्याने आपल्या वर्ग मित्रांच्या मदतीने पोर्टेबल व्हेंटीलेटर तयार करुन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.