गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२८) १,३६७ नमुने तपासणी करण्यात आले. यात ५७३ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७९४ स्वॅब नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४ नमुने निगेटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२९ टक्के आहे.
काेराेनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील ४५ वर आली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश होता. मात्र काही जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस आजाराचे रुग्ण आढळल्याने सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे आता जीवनावश्यक वस्तुंसह सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेतच पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी डेल्टा प्लसचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. सोमवारी जिल्ह्यात ७ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ४ नवीन रुग्णांची भर पडली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,९३,४५० स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,६८,३८४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. याअंतर्गत २,१५,६४२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,९४,६९२ नमुने निगेेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१२० कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०,३७६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
..................
लसीकरण मोहिमेला आला वेग
जिल्ह्यात लसीकरणासाठी लसींचा पुरेसा पुरवठा करण्यात आल्याने लसीकरण मोहिमेला गती आली आहे. जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन आतापर्यंत ४,०६,४७४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांनंतर आता तरुणांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
...............
डेल्टा प्लसच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर
राज्यातील सहा जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाने डेल्टा प्लसचा संसर्ग असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. तसेच या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी याची माहिती प्रशासनाला देण्याच्या सूचना केल्या आहेत.