गोंदिया : कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २४) ३८९५ नमुने तपासण्यात आले. यात १००५ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २८८७ स्वॅब नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१० टक्के आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच समाधानकारक बाब आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली आहे. २४ जूनपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांची संख्या ही ७० च्या आतच आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी आहे. जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश असल्याने सर्वच व्यवहार सुरळीत झाले असून जिल्हा पूर्णपणे अनलॉक आहे. मात्र, जिल्हावासीयांनी अजूनही खबरदारी बाळगण्याची गरज आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३ बाधितांनी मात केली तर ४ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १,८९,८४७ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,६४,७९७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत २,०९,६०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,८८,६६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१०१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०,३५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
लसीकरणाची चार लाखांकडे वाटचाल
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३,८२,८६९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असून, एकूण १४० केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू आहे.