गोंदिया - आमगाव : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार अभयकुमार धोती (३०, रा. कुंभारटोली) याचा पोलीस कोठडीतच शनिवारी (दि. २२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर धोती याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी तब्बल ३२ तासांनंतर म्हणजेच रविवारी (दि. २३) दुपारी १ वाजता गोंदिया येथे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.
आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. २०) अटक केली होती. पथकाने त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर शुक्रवारी (दि. २१) रात्री १ वाजता मृत राजकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना पथकाने आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याने या दिशेने तपास होणे आवश्यक असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
फक्त चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना दुसऱ्या दिवशीही आमगाव पोलिसांकडे सोपविता येऊ शकत होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने रात्रीच त्या तिन्ही आरोपींना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन का केले. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्यांना मारहाण केली का? मारहाण केली तर या चोरीतील तिघांपैकी दोघेजण अजूनही पोलिसांच्या तावडीत आहेत. त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांच्यावर दबाव नसावा का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात २२ मे रोजी पहाटे ५.१५ वाजता मरण पावलेल्या राजकुमार धोती याच्या मृतदेहाची आमगाव येथे उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही. नागरिकांचा आक्रोश पाहता मृतदेह गोंदियाला पाठविण्यात आला. परंतु गोंदियातही रविवारी (दि. २३) दुपारी १ वाजता उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली. आमगाव येथील न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या समोर कॅमेरा सुरू करून गोंदियातील तीन डॉक्टरांच्या चमूने उत्तरीय तपासणी केली आहे. ३२ तासांनंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आमगावला रवाना करण्यात आला. अंत्यसंस्कार होईपर्यंत आमगावात पोलिसांचा चोख बंदोबस्त हाेता.
बॉक्स
आमगावचे नवे ठाणेदार विलास नाळे
आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी अशा चौघांना दोषी ठरवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडकाफडकी निलंबित केले. आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण यांचे निलंबन झाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन ठाणेदार म्हणून विलास नाळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
-------------------------
पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिली भेट
या प्रकरणाला घेऊन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी आमगाव येथे भेट दिली. यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी त्यांची भेट घेऊन या प्रकरणात दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी सीआयडीमार्फत उच्चस्तरीय तपासणी करावी, मृताच्या कुटुंबीयांस शासन व पोलीस विभागाकडून आर्थिक मदत द्यावी, कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. तसेच पत्रपरिषद घेऊन माहिती दिली.