अर्जुनी मोरगाव : प्रशासनातील काही अधिकारी अभ्यागतांशी उद्धट वागण्याचे प्रकार नवीन नाहीत पण चक्क पोस्टमास्तरच ग्राहकांशी फ्री स्टाईल करतो ही बाब निश्चितच गंभीर आहे. हा प्रकार अर्जुनी मोरगावच्या टपाल कार्यालयात बुधवारी घडला. फ्री स्टाईल करणाऱ्या पोस्टमास्तरचे नाव सयाम असल्याचे समजते.
ग्राहकांशीच फ्री स्टाईल करीत असल्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर प्रसारित झाला. स्थानिक पोस्टमास्तर कार्यालयात राहात नाही, मद्यपान करून असतात. कधी हजर असूनही कामे करत नाहीत. ग्राहकांची कामे कधीच वेळेत होत नाही अशा अनेक तक्रारी होत्या. लोकमतने ५ ऑगस्ट रोजी पोस्टमास्तरच्या त्रासामुळे ग्राहक त्रस्त या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. साकोलीच्या टपाल अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी नवीन पोस्टमास्तर येतील, असे सांगितले होते. मात्र पाणी कुठे मुरले कुणास ठावूक? तेच पोस्टमास्तर कायम आहेत. त्या पोस्टमास्तरचे कारनामे अद्यापही संपले नाहीत. ग्राहकांशी असभ्य वर्तणूक होत असल्याने वारंवार ग्राहक व पोस्टमास्तर यांच्यात वादविवाद होतात. ग्राहक तर त्रस्त आहेतच परंतु मासिक आवर्त ठेव जमा करणारे प्रतिनिधी सुध्दा पोस्टमास्तरच्या अशा वर्तनामुळे कंटाळले आहेत. कितीतरी दिवस येथे आर्थिक व्यवहार ठप्प असतात. यामागे लिंक बंद असल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली जाते. अधिकारी तक्रारींकडे कानाडोळा करीत असल्याने पोस्टमास्तरचे धिंगाणा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोस्टमास्तरची त्वरित हकालपट्टी करा अन्यथा टपाल कार्यालयच बंद करा, असा सूर आवळला जात आहे.