लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मौजा गवर्रा येथील शासनाच्या मालकीच्या तलावात एका कंत्राटदाराने अवैध मुरुम खोदण्यासाठी मोठा खोल खड्डा खोदला आहे. गुरे, ढोरे धुणे व कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला-पुरुषांसाठी हा खड्डा प्राणघातक ठरतोय. प्रशासनाकडे खड्डा बुजविण्याची मागणी करुनही ते याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रशासन एखादा बळी जाण्याचीच ते वाट बघत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रसंगी येथे जलसमाधी घेण्याचीही तयारी असल्याचे ग्रामस्थांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले.मौजा गवर्रा येथील गट क्रं.१४८ आराजी १०.७६ हे.आर. मध्ये शासकीय मालकीचा तलाव आहे.या तलावातील पाण्याने सिंचन, गुरे-ढोरांना पाणी पाजणे व कपडे धुण्यासाठी आहे. सुमारे २ वर्षापूर्वी या परिसरात रस्त्याचे काम सुरु असताना एका कंत्राटदाराने मुरुम काढण्यासाठी येथे सुमारे २५ फुट लांब, २५ फुट रूंद व १० फुट खोल खड्डयाचे खोदकाम केले. या मुरुमाची विल्हेवाट रात्रीच केली जात होती. असा ग्रामस्थांना आरोप आहे.तलावात पाणी असल्यानंतर हा खड्डा दृष्टीस येत नाही. ग्रामीण भागात ट्रॅक्टर, गुरे धुण्यासाठी तलावातील पाण्याचा वापर केला जातो. या खड्ड्यात एक-दोनदा तर ट्रॅक्टरही बुडाल्याच्या घटना घडल्या. जवळच पाणघाट आहे. महिला येथे धुणी धुतात. त्यावेळी सुद्धा त्या नकळत खड्ड्यात गेल्याची घटना घडण्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र सुदैवाने यावर्षी कुठलीही जिवीतहानी झाली नाही. यासंदर्भात तुकुमनारायण ग्रामपंचायतने १३ आॅगस्ट २०१८ रोजी सरपंच शुभांगी तिडके यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत हा मुद्दा ग्रामवासीयांनी चांगलाच रेटून धरला. व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याविषयी ठराव क्रं.९/१ पारित करण्यात आला. गवर्रावासीयांनी सुद्धा यासंदर्भात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना २८ जून २०१८ रोजी लेखी पत्र दिले. उपविभागीय अधिकाºयांनी तहसीलदारांना पत्र देऊन मौका चौकशीचे आदेश दिले.केशोरीच्या तलाठ्यांनी १९ एप्रिल रोजी मौका तपासणी केली व यावर शिक्कामोर्तब केले.यात अवैधरित्या मुरुम खोदकाम केल्याचे म्हणने आहे. ग्रामस्थांच्या वतीने यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असताना याकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय बळावला असून प्रशासन याठिकाणी एखादा बळी जाण्याची प्रतिक्षा तर करीत नाही ना? असा आरोप केला जात आहे. प्रशासनाने असाच हलगर्जीपणा दाखविल्यास प्रसंगी याच ठिकाणी जलसमाधी घेण्याची ग्रामस्थांनी तयारी असल्याचे लोकमत प्रतिनिधीजवळ सांगितले. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तलावातील ‘तो’ खड्डा ठरतोय प्राणघातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:20 PM