आरोपींना त्वरित अटक करा : सीबीआय चौकशी करा : तहसीलदारांना दिले निवेदन
परसवाडा : तिरोडा शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या चुरडी येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्या हत्याकांडातील आरोपींचा शोध चार दिवस लोटूनही लागला नाही. आरोपींचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन दवणीवाडा, तिरोडा येथील पोवार समाजबांधवांच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या नावे शुक्रवारी (दि. २४) तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना देण्यात आले.
निवेदनातून आरोपींचा त्वरित शोध घेण्यात यावा, पोलीस विभागाने तपासणीसाठी घेतलेले वैद्यकीय नमुने, फिंगर प्रिंट, अन्न तपासणी, मोबाईल, व्हिसेरा अहवाल जलदगतीने करून आरोपींना कठोर शिक्षा करावी. बिसेन कुटुंबातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, चार लोकांची हत्या करण्यात आली असून याचा तपास तातडीने सीबीआय करुन करण्यात यावा. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्या. तसेच या हत्याकाडांचा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी दवनीवाडा क्षेत्राचे अध्यक्ष अन्ना चौधरी, रामेश्वर हरिणखेडे, तिरोडा येथून राधेलाल पटले, नरेंद्र रहांगडाले, नितेश ठाकरे, राजलक्ष्मी तुरकर, वाय. टी. कटरे, राजेश तुरकर, प्रेम रहांगडाले, लोकेश रहांगडाले, कैलाश पटले, रमेश पटले, सुरेश पटले, डॉ. वाय. सी. भगत, सुरतीलाल भगत व पोवार समाजबांधव उपस्थित होते.