गोंदिया : जातीतील विवाह योग्य मुलामुलींचे लग्न जुळणे सोईचे व्हावे याकरिता पोवार समाज संघटना शास्त्री वाॅर्डच्यावतीने अखिल भारतीय पोवार समाज ऑनलाइन मॅरेज ब्युरो स्थापन करण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला आहे.
संघटनेची सहविचार सभा गुरुवारी (दि.१९) सचिव खुशाल कटरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अनिल टेंभरे होते. वेळेअभावी लग्न जोडण्यासाठी परंपरागत पध्दती स्वीकारणे गैरसोईचे झाले आहे. अशात तांत्रिक संसाधनांचा वापर करून हेच कार्य निश्चितच कमी वेळेत करता येणे शक्य असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मॅरेज ब्युरोचे कार्यक्षेत्र, अखिल भारतीय पोवार समाज राहणार आहे. यात सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संचालन संघटन सचिव खुशाल कटरे यांनी केले. आभार शंकर कटरे यांनी मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष बी.डब्ल्यू. कटरे, कोषाध्यक्ष डॉ.के.एस.पारधी, प्रचारप्रमुख टेणीलाल बिसेन, सदस्य डाॅ.नारायण बिसेन, सदस्य शंकर कटरे व अन्य सदस्य उपस्थित होते.