गोरेगाव : एकीकडे रब्बीचे धान पीक विक्रीसाठी शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्राचे चकरा मारत आहे. यातच खरीप हंगामातील धानाची चुकारे व बोनस अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. यातच वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न तालुक्यातील व हिरापूर येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यात सध्या शेतकऱ्यांनी थकीत आणि चालू बिल भरले नसल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यातच हिरापूर येथील काही शेतकऱ्यांचे चालू वीज बिल भरले नसल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात हिरापूर येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी (दि.१) सहाय्यक अभियंता वहाने यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. चालू वीज बिल भरण्यासाठी २५ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात खार टाकली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतातील पऱ्हे वाळण्याच्या स्थितीत आहे. एकीकडे वीज नसल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. वीज वितरण कंपनीने बऱ्याच शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा जवळपास वीज बिल पाठविले आहे. अशावेळी लागवड खर्च व विद्युत बिल शेतकऱ्यांना एकाच वेळी करणे शक्य नाही. त्या दिशेने संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी हिरापूर येथील शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात माजी उपसभापती बबलू बिसेन, राजाराम चव्हाण, भेजेंद्र रहांगडाले, विकास कटरे, भैयालाल डोहळे उपस्थित होते.