अर्जनी-मोरगाव : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व अतिदुर्गम भाग असलेल्या कोहलगाव, रामपुरी व अन्य दहा पंधरा गावांत गेल्या १५ दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू आहे. घरगुती वापरासह शेती व लघु उद्योगावर याचा मोठा परिणाम होत आहे. वीजपुरवठा नियमित सुरू राहावा, यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात परिसरातील अनेक गावच्या सरपंचासह शिष्टमंडळाने वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता फुलझेले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत कोहलगावअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तसेच या परिसरातील अन्य ग्रामपंचायतीच्या परिसरातील गावांमध्ये विजेची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार विद्युत गुल होणे तसेच विद्युतच्या कमी दाबामुळे घरगुती दिवे, पंखे, कुलर व घरगुती पाण्याच्या मोटारी अजिबात चालत नाहीत. विजेच्या अशा लंपडावामुळे विजेवर चालणारे अनेक उपकरण निकामी झाले आहेत. तसेच रामपुरी पाणीपुरवठा योजना ही परिसरातील पंधरा-वीस गावांमध्ये पाणी पुरविणारी योजना आहे. मात्र, वीजपुरवठा बरोबर होत नसल्याने या परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रामपुरी,धाबेपवनी, झासीनग, कोहलगाव, कान्होली या ग्रामपंचायतीसह अन्य गावांतील वीजपुरवठा आठ दिवसांत योग्यप्रकारे सुरू झाला नाही तर परिसरातील नागरिकांसह मोठे आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिला आहे.
शिष्टमंडळात तालुका भाजपध्यक्ष अशोक लंजे, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, दिलीप रहेले, कोहलगावच्या सरपंच माधुरी चांदेवार, गुरुदेव चांदेवार, रामपुरीच्या सरपंच बुडगेवार, नरेश बुडगेवार, पवनी धाबेच्या सरपंच नंदेश्वर, पराग कापगते, कैलास पंधरे यांचा समावेश होता.