गोंदिया : महावितरणच्या गोंदिया परिमंडळात येत असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक वर्गवारीतील तब्बल २९ हजार २६० ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडील थकबाकीचीही रक्कम २० कोटी ५ लाख रुपये असून, ती वसूल करण्यासाठी आता महावितरणने कंबर कसली आहे. याच मोहिमेंतर्गत आतापर्यंत ३९५० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
वीज बिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून
करण्यात येत आहे. थकबाकीदारांचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदारांचा
वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वीज बिल वसुली व
थकबाकीदारांविरुद्धच्या कारवाईला वेग आला आहे. गोंदिया परिमंडळात आतापर्यंत ३ हजार ९५०
ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गोंदिया व भंडारा ग्रामीण व शहरी पाणी
पुरवठा योजनेची थकबाकी ६ कोटी ४३ लाख तसेच ग्रामीण व शहरी पथदिव्यांची थकबाकी ३२
कोटी ९५ लाख झाली आहे. शासकीय आस्थापनेवरील ग्राहकांची थकबाकी २ कोटी ३२ लाख
एवढी असून, त्यांच्यावरदेखील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
.....
पाणी पुरवठ्यावर संकट
गोंदिया परिमंडळातील अनेक पाणी पुरवठा योजनांवर ६ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांची थकबाकी ३२ कोटी ९५ लाख रुपये आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने धडक माेहीम सुरू केली आहे. त्यामुळे या योजनांचा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......
वर्गवारी गोंदिया मंडळातील एकूण थकबाकी
घरगुती २९ कोटी ६४ लाख
वाणिज्यिक ४ कोटी ९१ लाख
औद्योगिक ६ कोटी २४ लाख
ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा
२ कोटी ४० लाख
ग्रामीण व शहरी पथदिवे
२१ कोटी ९८ लाख
शासकीय १ कोटी ६९ लाख