मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : शिक्षण माणसाचा तिसरा डोळा आहे. अनेकांनी शिक्षणाची गंगा पसरवली. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो नक्कीच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जप करत आदिवासीबहुल भागातील घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ते वंचित राहू नयेत, असा निरंतर अट्टाहास ठेवून आदिवासी भागातील घटकांचे शिक्षणाशी नाते जोडणारा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न एक अवलिया करीत आहे.
प्रभाकर शोभेलाल दहिकर असे त्या अवलियाचे नाव आहे. ते गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागातील रहिवासी आहेत. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय व आर्थिक भागात मोलाचा वाटा आहे. प्रभाकर यांच्या मनात लहानपणापासूनच सामाजिक सेवेची आवड आहे. म्हणून समाजातील प्रत्येक घटक हा शिक्षित व्हावा. तो उपेक्षित राहू नये, यासाठी नेहमी कार्यक्षम असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. प्रभाकरने आतापर्यंत गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक आदिवासी भागात जाऊन समाजातील अनेक मुलांना व मुलींनी पाठ्यपुस्तके, वह्या, वही, पेन कंपासपेटी पेन्सिल आणि ऑनलाईन शिक्षण घेता यावे म्हणून समुहाने लाॅपटापची सोय करून दिली. शिक्षण बंद होऊ नये, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि आर्थिक मदतही नेहमी करत असतात. यांच्या कार्याला सलाम आहे.
........
माझी तळमळ ही समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. महामानवासारखे मी नेहमी शिक्षणासह इतरांचे नाते जोडत राहीन.
- प्रभाकर दहिकर,
...........
या विद्यार्थ्यांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात
आयुष दहिकर, वंदना सिरसाम, शीतल मरस्कोले, कुणाला उईके, काजल कुंभरे, भावना कोळवडे, प्रशांत कोळवते, अजित उईके, चेतन कुभंरे, विशाल कुभंरे, महेंद्र उईके यांना प्रभाकरने मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले.