गोंदिया : स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला विषाणुनिदान चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील संकलित नमुन्यांचे निदान स्थानिक प्रयोगशाळेतच केले जाते, मात्र मागील १५ दिवसांपूर्वी प्रयोगशाळेतील २० पैकी १८ तांत्रिक कर्मचारी बाधित आढळल्याने कार्यप्रणाली चांगलीच प्रभावित झाली होती. दरम्यान ५ हजारांहून अधिक नमुन्यांचा अहवाल प्रलंबित राहत असल्याने संशयित रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु आता जिल्हा प्रयोगशाळेचे कार्य पूर्ववत होऊ लागले आहे. आजघडीला प्रयोगशाळेकडे फक्त ४६६ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणुनिदान प्रयोगशाळेवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यानुरुप तांत्रिक कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत चालला होता. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच उद्रेक पहावयास मिळाल्याने नमुना संकलनाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली. तर दुसरीकडे जिल्हा प्रयोगशाळेतील २० पैकी १८ कर्मचारी बाधित आढळल्याने दैनंदिन कामकाज प्रभावित झाले होते. परिणामी जिल्हा प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांचे प्रलंबन वाढत चालले होते. यामुळे संशयित रुग्णांना अहवालासाठी ८ ते ९ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा प्रयोगशाळेची कार्यप्रणाली पूर्ववत होऊ लागली आहे. यामुळे प्रलंबित नमुन्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे.