सडक-अर्जुनी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धान खरेदी व भरडाईला घेऊन येत असलेल्या अडचणींना घेऊन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या दालनात शुक्रवारी (दि.२१) बैठक घेतली. या बैठकीत धान खरेदी केंद्र सुरू करण्यावर भर देण्यात आला असून उघड्यावरील धानाची प्राधान्याने उचल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत आमदार चंद्रिकापुरे यांनी, मिलिंग लवकरात लवकर सुरू करणे, शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे व २७ तारखेच्या आत सर्व धान खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत असे निर्देश सर्व मिलर्स, प्रादेशिक आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनला दिले. यावर जिल्हाधिकारी मीना यांनीही सकारात्मकता दर्शविली. तसेच धानाच्या भरडाईचा सुद्धा तिढा सुटला असून उघड्यावरील धानाची प्राधान्याने उचल केली जाणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी वानखेडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अजय बिसने, आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक (भंडारा) राठोड तसेच मिलमालक उपस्थित होते.