गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी झाली सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाचे त्याबाबत आदेश आले असून येत्या २५ तारखेला प्रभागाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावयाची आहे. त्या दृष्टीने पालिकेतील कर्मचारी कामाला लागले आहेत. १० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक अनिल पांडे यांचे महिनाभरापूर्वी अपघाती निधन झाल्याने तेथील नगरसेवकपद रिक्त झाले आहे. प्रभाग क्रमांक १ मधील (ड) सर्वसाधारण प्रवर्गातून ते निवडून आले होते. आता या प्रभागातील एक जागा रिक्त झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषदेला ९ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या पोट निवडणुकीकरिता मतदार यादीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगर परिषदेने मतदार यादीच्या कार्यक्रमावर काम सुरू केले आहे. यासाठी कर विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून येत्या २० तारखेपर्यंत संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे. २५ तारखेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ मार्चपर्यंत या यादीवर दावे हरकती घेतल्या जातील. तर १० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावयाचे कार्यक्रमात नमूद आहे.(शहर प्रतिनिधी)नवीन सदस्याला मिळणार दोनच महिने४अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक लक्षात घेता एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबर महिन्यात पालिकेच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकांची आचारसंहिता सहा महिन्यांपूर्वी लागणार असल्याचे समजते. म्हणजेच जून महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशात नव्याने निवडून येणाऱ्या सदस्याला एप्रिल व मे हे दोनच महिने काम करण्यासाठी मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात काही परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हा अंदाज फीट बसल्यास नव्याने निवडून येणाऱ्या सदस्याला फक्त दोन महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. विधानसभेची मतदार यादी ग्राह्य ४नगर परिषदेच्या या पोटनिवडणुकीसाठी सन २०१५ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचीच मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे त्या आधारावरच ही पोटनिवडणूक घेतली जाणार असून त्याचप्रकारे पालिकेची तयारी सुरू आहे. मात्र आता प्रभागातील पाहणी करण्यासाठी सन २०११ मध्ये पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीती मतदार यादीची मदत घेतली जात आहे. कर्मचारी या कामासाठी लागले असून प्रभागातील पाहणीचे काम सुरू झाले आहे. मात्र पोटनिवडणुकीनंतर काही महिन्यातच सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यामुळे अवघ्या काही महिन्यासाठी मिळणारे नगरसेवकपद मिळविण्यासाठी कोणी फारसे इच्छुक दिसत नाही.
पोटनिवडणुकीची तयारी सुरू
By admin | Published: February 19, 2016 2:02 AM