गोंदिया : मृग नक्षत्राला सुरुवात झाली तरी जिल्ह्यात मृगाच्या दमदार सरी बरसल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास पाऊण तास झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र होते.
हवामान विभागाने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र १७ जूनपर्यंत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज यंदा सुध्दा फोल ठरतोय काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पावसामुळे आता शनिवारपासून खरिपातील धान पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना सुध्दा थोडा दिलासा मिळाला आहे.