अर्जुनी/मोरगाव : स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थ्यानी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, गोरगरीब विद्यार्थ्याना मोफत शिक्षणाची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी शासन स्तरावरून भरघोस प्रयत्न केले जातात. मात्र प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे या योजनेलाच तडे जात आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोठ्या संख्येने विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला. मात्र येथील कला व विज्ञान शाखेत कनिष्ठ व्याख्यातांचा मोठा अनुशेष आहे. येथील कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे ३३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कला शाखेत ११ वी व बारावीची प्रत्येकी एक तर विज्ञान शाखेत ११ वी व १२ वीची प्रत्येकी एक तुकडी आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेसाठी केवळ इंग्रजी व मराठी या दोन विषयांचेच व्याख्याने कार्यरत आहेत. येथे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसाठी व्याख्याते नाहीत. विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, गणित व भौतिकशास्त्र या विषयांचे व्याख्याते कार्यरत आहेत. येथे रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांसाठी व्याख्याते नाहीत. जिल्हा परिषद शाळांमध्ये ही बाब नवीन नाही. गतवर्षीसुध्दा या कनिष्ठ महाविद्यालयात अशीच स्थिती होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे व्याख्यातांची मागणी करून संपूर्ण वर्ष व्याख्यातांविना पूर्ण होते. मात्र अशा गंभीर विषयांची गांभीर्याने दखलच घेतली जात नाही. जि.प.चे अधिकारी व पदाधिकारी केवळ कोरडी आश्वासने देतात. यावर्षी पूर्ण व्याख्यातांची मागणी केल्यानंतरही केवळ भौतिकशास्त्र या विषयाच्या व्याख्याताची नियुक्ती या शाळेत करण्यात आली. व्याख्यातांविना या शाळेची अवस्था दयनिय आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थी संख्येत झपाट्याने वाढत आहे. मात्र शिक्षण विभागाचे प्रशासन तेवढेच सुस्त आहे. विद्यार्थी व पालकांना योग्य शिक्षण मिळत नसेल तर जिल्हा परिषद शाळात शिकण्याचा अर्थ काय? असा प्रश्न विचारला जात आहे. कनिष्ठ व्याख्यातांच्या अनुशेषामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता नुकसान टाळण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कनिष्ठ व्याख्यातांची नियुक्ती करावी, अन्यथा आठवडाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यानी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांसाठी विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात
By admin | Published: July 24, 2014 11:54 PM