गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस अधुनमधून जिल्ह्यात हजेरी लावत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची तारांबळ उडाली होती.
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. बुधवारी (दि. १९) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ मिनिटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट निघाले होते. वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली, तर काही व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या टिनाच्या छताची सुध्दा पडझड झाली होती. जिल्ह्यात रब्बी धानाची कापणी आणि मळणीची कामे सुरू आहे. त्यातच अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे.
..............
उघड्यावरील धानाला फटका
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने मागील खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदी केले. त्यापैकी जवळपास दीड लाख क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. या धानाला मागील सात-आठ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...........
तूर्तास धान कापणी नकोच
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. यापैकी ७ ते ८ हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांधामध्ये धान पडून आहे. या धानाला बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले. तसेच हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तूर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.