गोंदिया: येथील भारत बटालियन दोनच्या बिरसी कॅम्प येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देविदास गंगाधर बंड यांना गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक देविदास गंगाधर बंड हे सशस्त्र पोलीस शिपाई पदावर १ मे १९९९ रोजी राज्य राखीव पोलीस बल, गट नागपूर येथे भरती झाले. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत नक्षल बंदोबस्त मंगेझरी जि. गोंदिया येथे तैनातीस असतांना २० एप्रिल १९९३ रोजी नक्षलवाद्यांनी अचानक घडवून आणलेल्या भुसुरूंग स्फोटात पोलीसांचे एक वाहन नष्ट करण्यात आले. अशा गंभीर परिस्थितीत त्यांनी नक्षलवाद्यांशी धैर्याने मुकाबला केला. त्यांच्या सहकाऱ्यांना जास्तीत जास्त सुरक्षा दिली आणि शस्त्रास्त्रे वाचवली. या त्यांच्या धाडसापोटी त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक, मुंबई यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे. त्यांना विविध कठीण कर्तव्याबाबत सन २००२ मध्ये आंतरिक सुरक्षा पदक प्रदान करण्यात आले. सन २००३ मध्ये खडतर सेवा पदक प्रदान करण्यात आले. सन २००७ मध्ये गुणवत्ता पूर्ण सेवे बद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
त्यांच्या ३० वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरी बद्दल १५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या ७५ व्या अमृत मोहत्सवाच्या स्वातंत्र्य दिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक बहाल करण्यात येणार आहे.