गोंदिया : दरवर्षी घडणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ७० टक्के अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्यानेच होतात. यात अनेकांना जीव गमावावा लागतो तर काहींना अपंगत्व येते. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच वाढत्या अपघातांना आळा घालण्यास मदत होईल. पालकांनीसुद्धा जागृत होऊन अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यासाठी देऊ नये, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून व सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने दरवर्षीनुसार मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २० जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगरसेविक भावना कदम, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मोटार वाहतूक नियमासंबंधी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी मांडले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सर्वसामान्य जनतेस मोटार वाहन नियमांची माहिती व रस्ता सुरक्षेबाबत माहिती दिली. अपघातांची संख्या कशी कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले. दिनेश तायडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहतूक अपघातांची टक्केवारी याबाबत माहिती दिली. तसेच वाहन चालविताना शिस्त अंगीकारणे काळाजी गरज असल्याचे सांगून ओव्हर स्पीड व वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास गोंदिया शहरातील आधार महिला सामाजिक संस्था, वाहन विक्रेते, विमा प्रतिनिधी, वित्त संस्थांचे अधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल व्यवस्थापक, बसमालक, ट्रक चालक/मालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता बहेकार यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपिक राहुल कुरतोटवार यांनी मानले.