भंभोळी ते चांदोरी रस्त्याची दुर्दशा
मुंडीकोटा : जवळील ग्राम भंभोळी ते चांदोरी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, रस्ता पूर्णपणे उखडला आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे.
वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली
आमगाव : गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून अगदी सकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फिरणाऱ्यांच्या गर्दीने शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गजबजून गेलेले दिसत आहेत. कोरोना काळात ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी सकाळी फिरण्याचा उपयोग होत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यात हिवाळ्यात सकाळी फिरणे आरोग्यासाठी चांगले मानत असल्याने थंडी असूनही फिरणारे नित्यनेमाने फिरताना दिसतात.
निराधार लाभार्थींचे अर्ज भरून घेतले
गोंदिया : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष साहाय्य्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अमलात आणली जात आहे. याअंतर्गत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी नगर परिषद क्षेत्रातील लाभार्थींपर्यंत पोहचून त्यांचे अर्ज भरून घेतले.
परसबागेतून मिळणार महिलांना रोजगार
तिरोडा : सेंद्रिय भाजीपाल्याची वाढती मागणी व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने याच बाबीला हेरून अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा ग्राम बेरडीपार येथील ५० महिलांना परसबाग लागवडीचे प्रत्यक्षिक देऊन भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे आता महिलांना परसबागेतूनही रोजगार मिळणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्ता बांधकामांना घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. सातत्याने हा प्रश्न उपस्थित होत असताना मात्र प्रशासनाकडून अद्यापपर्यंत हा प्रश्न सोडविला गेला नाही.
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. यासाठी गावोगावी फिरून मिळालेल्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांच्या समस्या कायम आहेत.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक-अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्ती गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा अनेक गावांत फज्जा उडाला आहे.